लोकसहभागातून कळंबस्तेत २९० मीटर शेत पाणंद रस्ता
शून्य खर्चातील जिल्ह्यातील पहिला उपक्रम

चिपळूण : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत तालुक्यातील कळंबस्ते येथे २९० मीटर लांबीचा शेत पाणंद रस्ता लोकसहभागातून साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणताही शासकीय आर्थिक खर्च न करता हा रस्ता उभारण्यात आल्याने जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकारातून या कामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचा हिस्सा बक्षीसपत्राद्वारे दान दिल्यामुळे रस्त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी नाम फाउंडेशनने मोफत जेसीबी उपलब्ध करून दिला, तर जलसंपदा विभागाने भरावासाठी लागणारी माती, गाळ व डंपर विनामूल्य पुरवले. स्थानिक कंत्राटदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने ट्रॅक्टर व रोलरची मदत केली.
चिपळूण महसूल प्रशासनाने वेगाने जमिनीची मोजणी पूर्ण करून कामाला गती दिली. रस्त्याचे काम सुरू असताना कोतवाल, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चार दिवस घटनास्थळी थांबून काम पूर्ण करून घेतले.
या उपक्रमात पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी सभापती शौकत मुकादम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे तसेच ग्रामस्थ व प्रशासनाचे मोलाचे योगदान लाभले.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडे नोंद नसलेले शेत पाणंद रस्तेही या योजनेतून विकसित करता येतात. मात्र त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी कायदेशीररित्या जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


