मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुकुंद पालांडे आत्महत्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : शहरातील एका नामांकित बँकेचे डेप्युटी मॅनेजर असलेल्या मुकुंद मुरलीधर पालांडे यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय शेट्ये, योगेश मोरे, वेदांत टाकळे आणि अखिलेश खेडेकर अशी त्यांची नावे आहेत.

मुकुंद पालांडे यांचा मृतदेह तीन दिवसांच्या शोधानंतर कोळकेवाडी-हसरेवाडी स्मशानभूमीलगतच्या धरण परिसरात आढळून आला. पालांडे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू होती. अखेर कोळकेवाडी धरणाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी पालांडे यांनी चार पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या धनंजय शेट्ये, योगेश मोरे, वेदांत टाकळे आणि अखिलेश खेडेकर या चौघांची नावे नमूद करत गंभीर आरोप केले आहेत. सुसाईड नोटमधील माहितीनुसार, बँकेतील एका महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत संबंधितांकडून पालांडे यांना ब्लॅकमेल केले जात होते. तसेच त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुसाईड नोटच्या आधारे अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!