
रत्नागिरी : “एकाच घराण्यातील व्यक्ती चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यांनी कोकणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांसाठी नेमके काय काम केले, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे,” असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी येथे उपस्थित केला.
कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या आमदार जाधव यांनी महायुती आणि त्यांच्या उमेदवारावर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक जण एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते एकमेकांना कितपत मदत करतात, यावर निकाल अवलंबून असेल,”
दरम्यान, भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना त्यांनी, “भाजपला स्वतःचे नेतृत्व तयार करता आले नाही. दुसऱ्या पक्षांतील तयार नेतृत्व आयात करावे लागते, हा त्यांचा नैतिक पराभव आहे,” अशी टीका केली.
कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचारात आता आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



