मुख्य बातमी

पटवर्धन हायस्कूलचा दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (सन २०२५-२६) मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, तसेच भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक वसंत आडर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटणकर यांनी केले. बक्षीस वितरणाची जबाबदारी हेमलता गुरव आणि प्रतिभा बंडबे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

यावेळी प्रमुख पाहुण्या प्राजक्ता कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जे काही कराल ते उत्कृष्ट करा. परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात यश मिळवता येते, शाळेची आठवण ठेवा, असे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. तानाजी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यवाह श्री. रायकर यांनी या यशाचे श्रेय पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक तसेच पालक व विद्यार्थी यांना दिले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात श्री. भावे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत पटवर्धन हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यामध्ये अक्षय अमोल माळवदे याने ९९.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गणित, विज्ञान आणि संस्कृत या विषयांतही प्रथम येण्याचा मान त्याने मिळविला. तीर्था दीपक मयेकर हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. दिशिता शिवदास खेडेकर हिने ९७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. ऋग्वेद प्रशांत पवार आणि स्वरदा सुमित मिराशी यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवून संयुक्त चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शर्वाणी प्रवीण मुळये हिने पाचवा क्रमांक पटकावला.

याशिवाय, इयत्ता दहावीच्या हिंदी विषयात प्रथम येण्याचा मान श्रेया विनायक राजापकर या विद्यार्थिनीने प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती शिरधनकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि शाळेच्या मार्गदर्शनाला दिले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!