कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी लाच घेताना “लाचलुचपत”च्या जाळ्यात

चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर “लाचलुचपत” विभागाने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सुशिक्षित महिलेने डॉ. मदार यांनी गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईची सूत्रे हलवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या सहा तासांच्या कालावधीत सापळा रचण्यात आला. त्यानुसार तक्रारदार महिलेकडून शिल्लक रकमेचे ४ हजार ५०० रुपये स्वीकारताना डॉ. कांचन मदार यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर संबंधित डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
डॉ. कांचन मदार या रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील परिचित आणि चर्चित नाव मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्या विरोधात झालेल्या या कारवाईची माहिती समोर येताच जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः सरकारी आरोग्य व्यवस्थेतील अधिकाऱ्यांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लाचेची मागणी, व्यवहाराची पार्श्वभूमी तसेच अन्य बाबींची चौकशी केली जात आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे सरकारी कार्यालयांप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



