मुख्य बातमी

हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; १.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जगन्नाथ पंडये (वय ४४, रा. पंडयेवाडी, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) याला या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिरजोळे पाटीलवाडी परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली.

छाप्यामध्ये दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य, गुळ, नवसागर मिश्रित रसायने तसेच तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या या प्रभावी कारवाईचे स्वागत केले आहे.

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, भैरवनाथ सवाईराम, योगेश शेट्ये आणि दत्ताराम कांबळे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!