जागतिक महासागर दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम

रत्नागिरी : जागतिक महासागर दिनानिमित्त (वर्ड ओशन डे) रत्नागिरीत विशेष जनजागृती व किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ८ जून रोजी यावर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक महासागर दिनासाठी ‘Reimagine: Beyond the world we know, a new relationship with our ocean’ (पुनर्विचार: आपल्या परिचित जगाच्या पलीकडे जात महासागराशी एक नवीन नाते निर्माण करूया) ही मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. केवळ समुद्राकडून संसाधने मिळवणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, मानवाने समुद्राचा खरा रक्षक बनले पाहिजे आणि समुद्राशी असलेले आपले नाते अधिक शाश्वत केले पाहिजे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव येथे असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र (रत्नागिरी) आणि शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र (मिऱ्या) किनार्यावर ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत समुद्र किनारा स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यावेळी उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर जमा झालेला प्लास्टिक कचरा, जुनी जाळी आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा केल्या. स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व विभाग प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांनी महासागराचे पूजन केले. यावेळी बोलताना डॉ. चौधरी यांनी महासागराच्या महत्त्वाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखण्यात समुद्र सर्वात मोठी भूमिका बजावतो. मानवाकडून निर्माण होणाऱ्या एकूण कार्बन डायऑक्साइडपैकी सुमारे ३० टक्के कार्बन समुद्र स्वतःमध्ये शोषून घेतो, ज्यामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग मंदावतो. तसेच आपल्याला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी तब्बल ५० टक्के पेक्षा जास्त ऑक्सिजन हा समुद्रातील वनस्पती व सूक्ष्मजीवांपासून तयार होतो. त्यामुळे समुद्राला ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ म्हटले जाते. सध्या समुद्रात प्लास्टिकचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. यामुळे सागरी जैवविविधता धोक्यात आली असून प्लास्टिकचे रूपांतर मायक्रोप्लास्टिकमध्ये होऊन ते मानवाच्या अन्नसाखळीत प्रवेश करत आहे असे प्रतिपादन डॉ. चौधरी यांनी केले.
“समुद्र हा आपल्या कोकणच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” अशी भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली. स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांनीही या मोहिमेचे कौतुक करून समुद्र स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. आसिफ पागारकर, सहाय्यक संशोधन अधिकारी डॉ. मनोज घुघुसकर, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. अपूर्वा सावंत यांनी विशेष सहभाग नोंदविला. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. राकेश जाधव, तौसीफ काझी, नीलेश मिराजकर, डॉ. सुशील कांबळे, मयुरी डोंगरे, कार्यालय अधीक्षक सचिन जाधव आणि राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महेश किल्लेकर, मनिष शिंदे, सचिन पावसकर, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, प्रवीण गायकवाड, भूमी भाटकर, श्री. पेडणेकर, स्वप्नील आलीम, प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



