मुख्य बातमी

रत्नागिरीत २६ एप्रिलला रंगणार सुश्राव्य ‘शाम-ए-गझल’ मैफिल

गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरीचेही आयोजन

रत्नागिरी : कला क्षेत्रातील प्रसिद्ध ‘आर्ट सर्कल फाउंडेशन’च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शाम-ए-गझल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (२६ एप्रिल) करण्यात आले आहे. यंदा या स्मृती सोहळ्याचे सहावे वर्ष असून, यानिमित्ताने गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची मैफिल अनुभवण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद लाभला. प्राथमिक फेरीतून प्रवीण देशमुख (पुणे), रोहन देशमुख (मुंबई), धीरेश काणेकर (सिंधुदुर्ग), आदिती माईणकर (रत्नागिरी), गौतमी वाडकर (संगमेश्वर), लिना खामकर (रत्नागिरी), रूपाली विघारे (पुणे), गिरीष जोशी (रत्नागिरी), प्रतीक्षा कोयंडे (कणकवली), स्वरा अभ्यंकर (रत्नागिरी) हे १० अंतिम स्पर्धक निवडण्यात आले.

या निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी होईल आणि त्यातून विजेते घोषित होतील. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे हा स्वरसोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे स्वरूप दोन सत्रांत असणार आहे. यात पहिल्या सत्रात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी दुपारी ३ ते ६:३० या वेळेत पार पडेल. निवडक स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट गझल गायकाचा शोध या माध्यमातून घेतला जाणार आहे. दुसऱ्या सत्रात ‘शाम-ए-गझल’ मुख्य मैफिल सायंकाळी ६:३० ते ८ या वेळेत होईल. यात लोकप्रिय हिंदी-मराठी गझल सादर होतील. सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे आपल्या मखमली आवाजात गझल सादर करतील. त्यांना तबल्यावर हेरंब जोगळेकर आणि व्हायोलिनवर उदय गोखले साथसंगत करणार आहेत.

गझल आणि साहित्याची ओढ असणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!