पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

रत्नागिरी : शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) शिवसेना बीएलए पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा यावेळी ना. सामंत यांनी घेतला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी दक्षिण भागात पक्षाचे काम नेहमीच भक्कम राहिले आहे. परंतु, बीएलए पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन नागरिकांशी संपर्क वाढवला पाहिजे. तुमचा संपर्कच पक्षाला अधिक मजबूत करेल. लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांची पावती जनतेपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. सरकारने महिला, तरुण, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी अनेक क्रांतीकारी योजना आणल्या आहेत. या योजना शेवटच्या माणसाच्या घरापर्यंत कशा पोहोचतील, यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कसा पुढाकार घेऊन कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीला आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महेश म्हाप, राजन शेट्ये, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, दीपक नागले, श्री. अश्फाक, रोहन बने, सावली कुरूप, सुदेश मयेकर, स्मितल पावसकर यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



