लांजा शहरात चिखलाचे साम्राज्य

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा फटका सध्या पडणाऱ्या पावसामुळे लांजा शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. शहरातील साटवली रोड ते कोर्ले फाटा या सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात चिखलाचे साम्राज्य पसरले असून पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “लांजा शहरासाठी कोणी वालीच उरला नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. शहरातील गटारे, सर्व्हिस रोड, तसेच काही पुलांच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती; मात्र ही कामे अर्धवट सोडण्यात आल्याने पावसाच्या पाण्यासह माती आणि चिखल रस्त्यावर साचला आहे. परिणामी, शहरातील मुख्य मार्गांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे.
विशेषतः साटवली रोड ते कोर्ले फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुचाकीस्वारांना चिखलातून वाहन चालविताना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर चारचाकी वाहनांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.
वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे चिखल उडून नागरिकांच्या अंगावर पडत असून कपडे खराब होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
महामार्ग ठेकेदार कंपनीच्या कथित चालढकल आणि दुर्लक्षामुळे गटारांची अपूर्ण कामे, सर्व्हिस रोडचे रखडलेले बांधकाम आणि अर्धवट पुलांची कामे यांचा एकत्रित परिणाम शहरावर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सध्या संपूर्ण परिसर लाल मातीच्या चिखलाने व्यापला असून महामार्ग लाल रंगाने रंगून गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासन, ठेकेदार कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून रस्त्यावरील चिखल हटवावा, अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी लांजा शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.



