सावरकर नाट्यगृहाच्या समस्यांबाबत नाट्य परिषद आक्रमक; नगराध्यक्षांना निवेदन सादर

रत्नागिरी : स्थानिक स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामधील विविध प्रलंबित समस्यांबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या कार्यकारिणीने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. नाट्यगृहाची दुरवस्था आणि कलाकारांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नाट्य परिषदेने हे पाऊल उचलले असून, यावर प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकण्याचे आश्वासन दिले आहे.
नाट्य परिषदेने दिलेल्या या निवेदनामध्ये नाट्यगृहातील अनेक महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यामध्ये नाट्यगृहातील काही ठिकाणच्या बंद असलेल्या लाईट्स तातडीने सुरू करणे, इमारतीच्या पाठीमागील बाजूला काँक्रिटीकरण करणे तसेच नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी हक्काचा भोजन कक्ष तयार करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, नाटकाच्या तांत्रिक बाबींचा दर्जा सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाईट्ससाठी एक ज्यादा पावर पॅक व एक नवीन स्लाइडर घेणे, तसेच म्युझिक सिस्टम सुरळीत चालण्यासाठी स्टॅबिलायझर बसविण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. नाट्यगृहाच्या स्वच्छतेसाठी नियमित फिनेल पुरवठा करावा आणि प्रेक्षागृहात खाण्याचे पदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, जेणेकरून स्वच्छता राखणे सोपे होईल, अशीही मागणी रंगकर्मींनी केली आहे. नाट्यगृहाच्या आवारामध्ये नाटकाच्या जाहिरातींचे फलक लावण्याकरता एकाच साईझमध्ये चॅनल तयार करावे, जेणेकरून विद्रुपीकरण टळेल, असेही यात सुचवले आहे. नाट्यगृहाच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि रंगकर्मी यांची एक संयुक्त कमिटी तयार करण्यात यावी आणि या कमिटीची दोन महिन्यातून एकदा सभा घेण्यात यावी, जेणेकरून नाट्यगृहातील सर्व समस्या प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात येऊ शकतील, असा एक महत्त्वाचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे तसेच मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी या मागण्यांबाबत नगरपालिकेकडून तातडीने योग्य ती सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाह वामन कदम, तसेच कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील, मनोहर जोशी, घनश्याम मगदूम, दादा कदम आणि विजय पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.



