मिरजोळे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे दूषित सांडपाणी वहाळात
परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बाधित : नागरिक संतप्त, संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांनी दूषित सांडपाणी वहाळात सोडल्याचा प्रकार रविवारी (१४ जून) सकाळी उघडकीस आला. हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अजूनही ओढे, नाले प्रवाहित झालेले नाहीत. असे असतानाच आज सकाळी मिरजोळे एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी दूषित सांडपाणी वहाळात सोडले. ते जांभूळफाटा परिसर ते करंदीकर वाडी भागातून वाहत जात आहे. त्या पाण्याला केमिकलसारखा वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम लोकवस्तीमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर झालेला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या तोंडावर थेट पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतच धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
यापूर्वीही अनेकदा कंपन्यांनी पावसाचे पाणी आणि ओढ्याच्या प्रवाहाचा गैरफायदा घेत रासायनिक पाणी सोडल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. मात्र, दरवेळी केवळ पोकळ आश्वासनांशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही लागलेले नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कंपन्यांवर अंकुश राहिलेला नाही. हे पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई, करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, याबाबत ग्रामपंचायतीकडूनही दूषित पाणी वहाळात सोडले जाऊ नये, यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. संबंधित कंपन्यांना प्रशासनाने सूचित करण्याबाबतचे पत्र वारंवार दिले जात असल्याची माहिती मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील यांनी दिली. तर पंचायत समिती सदस्य वैभव पाटील यांनीही कंपन्यांमधील दूषित पाणी वहाळाद्वारे सोडले जाऊ नये, यावर कायमस्वरूपी पर्याय करावा असा ठराव ग्रामसभेने केला असल्याची माहिती दिली.



