केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची आमदार शेखर निकम यांनी घेतली सदिच्छा भेट
चिपळूणच्या पूरनियंत्रणासह राष्ट्रीय जलमार्ग-२८ प्रकल्पावर सविस्तर चर्चा

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी शनिवारी सुरत येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची सदिच्छा भेट घेत मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान आमदार निकम यांनी चिपळूण शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी व शिव नदी पूरनियंत्रण प्रकल्पासाठी विशेष केंद्रीय निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच नदी खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, आधुनिक पूर पूर्वसूचना प्रणाली उभारणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रीय जलमार्ग-२८ अंतर्गत दाभोळ–गोवळकोट–चिपळूण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाला केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीबद्दल तसेच पुढील निविदा प्रक्रियेला दिलेल्या गतीबद्दल आमदार निकम यांनी केंद्रीय मंत्री पाटील यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील विविध विकासकामांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांवर आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी चिपळूणला कायमस्वरूपी पूरमुक्त करणे आणि राष्ट्रीय जलमार्ग-२८ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या प्रकल्पांमुळे व्यापार, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीमुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होण्याबरोबरच विविध विकास प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


