महिला सक्षमीकरणासाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, लांजा येथील कृषी विज्ञान केंद्र आणि रत्नागिरीतील आसमंत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे प्रशिक्षण ९ ते ११ जून या कालावधीत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमधील परिषद दालन येथे पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी शास्त्र परिभाषा कोश समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव उल्मेक हे उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हणमंते यांनी प्रशिक्षणादरम्यान कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात, पक्ष्यांची निवड, संगोपन, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, रोग नियंत्रण, स्वच्छता तसेच बाजारपेठेतील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याबाबतही डॉ. हणमंते यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील महिलांना पूरक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात शिरगांव, मिऱ्या व कसारवेली पंचक्रोशीतिल क्रांति बचत गटाच्या सदस्य महिला सहभागी झाल्या. कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी क्रांति महिला बचत गटाच्या प्रमुख सोनाली शिवलकर यांनी समाधान व्यक्त केले. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक महिला कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकतेची भावना बळकट होण्यास मदत होणार असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.



