मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पावसाळी साथी रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

राजापूर तालुक्यात ९ पथकांची नियुक्ती

राजापूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांना आटोक्यात आणण्यासाठी राजापूर तालुका आरोग्य विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४६ आरोग्य उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रात विशेष साथरोग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यू, तापसरी तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विविध संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी ही यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पावसाळ्यात गढूळ पाणी, साचलेले पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे विविध साथरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर संभाव्य रुग्णांची वेळेवर ओळख, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे.

तालुक्यातील ओणी, करक, फुपेरे, केळवली, सोलगाव, जैतापूर, जवळेथर, धारतळे आणि कुंभवडे या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच शिपाई यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही पथके आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना नियमित भेटी देऊन रुग्ण आणि परिसराचे सर्वेक्षण करणार आहेत. संशयित साथरोगग्रस्त रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असून पाण्याच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांनाही पावसाळ्यात स्वच्छता राखणे, पिण्याचे पाणी उकळून वापरणे, परिसरात पाणी साचू न देणे आणि ताप अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभाग यंदा पावसाळ्यापूर्वीच सज्जता वाढविली

राजापूर तालुक्यातील पाचल परिसरातील करक येथे सुमारे दहा वर्षांपूर्वी मलेरियाची मोठी साथ पसरली होती. तसेच दोन-तीन वर्षांपूर्वी नाटे आणि सोलगाव परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाला विशेष उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर तालुक्यात मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या साथींचा मोठा प्रादुर्भाव झालेला नसला, तरी भविष्यात अशा रोगांचा धोका नाकारता येत नसल्याने आरोग्य विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वीच सज्जता वाढविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!