कोकण नमन कलामंच रत्नागिरीचा नवा पायंडा; ‘माहेर’ संस्थेतील ४० विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी आणि कलेचा वारसा जपणाऱ्या ‘कोकण नमन कलामंच, रत्नागिरी’ या संस्थेने सामाजिक कार्यात एक नवा पायंडा घडवला. निवळी येथील ‘माहेर’ संस्थेतील ४० गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने चपलांचे (पादत्राणे) वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
हा अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम कोकण नमन कलामंचच्या जम्बो कार्यकारिणी मंडळाचे सदस्य आणि नवलाई नमन मंडळ (निवळी) चे अध्यक्ष तानाजी गावडे, हरिश्चंद्र रावणंग, प्रशांत बोंबले, आंबेकर आणि संपर्कप्रमुख श्रीकांत बोंबले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांच्या पायात चपला चढवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला हातखंबा येथील मनोज मनोहर नाचणकर यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण पाठबळामुळेच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाला काही पदाधिकारी मंडळी आपल्या नियोजित आणि पूर्वघोषित कामांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी फोनद्वारे संपर्क साधून मोलाचे मार्गदर्शन केले.
या यशस्वी उपक्रमानंतर, ज्या सर्व घटकांनी आणि सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांचे कोकण नमन कलामंच, रत्नागिरीचे संपर्कप्रमुख यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. संस्थेच्या या उपक्रमाचे रत्नागिरी जिल्ह्यातून आणि सामाजिक स्तरातून मोठे कौतुक होत आहे.



