मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर येथे १७ जूनला स्मार्ट मीटर जनजागृती व शंका निरसन शिबिर

राजापूर : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी तसेच आधुनिक वीज मापन तंत्रज्ञानाची योग्य माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे विशेष स्मार्ट मीटर जनजागृती व शंका निरसन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवारी (१७ जून) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत महावितरण उपविभागीय कार्यालय, राजापूर १ व २ येथे होणार आहे.

स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, पारदर्शक बिलिंग व्यवस्था आणि ग्राहकांना उपलब्ध होणाऱ्या डिजिटल सुविधांची माहिती या शिबिरात देण्यात येणार आहे. महावितरणच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून ग्राहकांच्या विविध प्रश्नांचे सविस्तर निरसन केले जाणार आहे.

स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होते का, वीज वापराची नोंद कशी पाहता येते, रिडिंगची माहिती कशी उपलब्ध होते, अशा विविध शंकांची अचूक उत्तरे ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच उपस्थित ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांचे जागेवरच निवारण करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्मार्ट मीटरविषयी समाजमाध्यमांवर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या भ्रामक अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी प्रत्यक्ष शिबिराला उपस्थित राहून योग्य माहिती घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शिबिराला येताना ग्राहकांनी आपले चालू वीज बिल सोबत आणावे, असेही सांगण्यात आले आहे.

राजापूर परिसरातील सर्व महावितरण ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण उपविभाग राजापूर १ व २ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!