राजेश सावंत यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) माजी जिल्हाध्यक्ष राजेश विनायक सावंत यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. गुरुवारी दुपारी स्टेट बँक कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघालेली अंत्ययात्रा आणि मिरकरवाडा स्मशानभूमीत झालेला अंत्यसंस्कारावेळी अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्याला, मित्राला साश्रू नयनांनी निरोप दिला.
दरम्यान, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत स्टेट बँक कॉलनी येथून सुरू झालेली ही अंत्ययात्रा मारुती मंदिर, जिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका येथून मार्गस्थ झाली. अंत्ययात्रा नगरपालिकेजवळ आली, तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रवासात रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. सर्वांच्या डोळ्यांत आणि ओठांवर फक्त एकच भावना होती की, हसतमुख स्वभावाचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुभाष बने, राजन साळवी, बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, शिवसेनेचे (ठाकरे) प्रसाद सावंत, किरण तोडणकर, शेखर घोसाळे, शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सेना-भाजपचे नगरसेवक, चिपळूण भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
राजेश सावंत यांच्या निधनाची माहिती मिळताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत हे तात्काळ पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते बुधवारी रात्री उशिरा आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दुःखाच्या या कठीण प्रसंगी आपण पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एक काळातील जिवलग मित्र असलेले राजेश सावंत विरोधी पक्षात गेल्यानंतरही त्यांचे संबंध अतिशय सलोख्याचे होते. रोखठोक बोलण्याच्या स्वभावामुळे त्यांना राजकारणात संघर्ष करावा लागला, मात्र जिवलग मित्रावर राज्यस्तरावर टीका झाल्यावर त्यांचा मित्रधर्म जागा झाला. “मी सामंत साहेबांचा विरोधक असलो, तरी त्यांच्यावर अशी टीका करणे योग्य नाही, संबंधित व्यक्तींनी माफी मागावी,” असा खडा सवाल करणारा स्टेटस त्यांनी बुधवारी ठेवला होता. दुर्दैवाने, हाच स्टेटस त्यांच्या मोबाईलवरील अखेरचा ठरला.



