राज्यात आजही पावसाचा अंदाज; कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : हवामान विभागाने शुक्रवारी कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची अंदाज व्यक्त केला असून, जळगाव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, शाहजहानपूर, कानपूर, दाल्तोंगज, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर तसेच आग्नेय बंगालच्या उपसागरात १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. यामुळे राज्यातील काही भागांत अजूनही पावसाची शक्यता कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण विभाग आणि गोव्यात मान्सूनची सक्रियता वाढणार असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो. समुद्र किनारी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्यालगतच्या भागात जोरदार सरींची शक्यता आहे. डोंगराळ परिसरात पावसाचा जोर वाढल्यास दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घाटमार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



