खेड रेल्वे स्थानकाजवळ साडेदहा किलोहून अधिक ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त
दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांची धाडसी कारवाई

रत्नागिरी : दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका धाडसी कारवाईत साडेदहा किलोहून अधिक ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून, याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ १६ जून रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
काही व्यक्ती ‘द वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’चे उल्लंघन करून अंबरग्रिसची अवैध वाहतूक व विक्री करणार असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचला. १५ व १६ जूनच्या मध्यरात्री खेड रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद हालचाल दिसताच अधिकाऱ्यांनी एका ‘रेनो क्विड’ कारला अडवून तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये साडेदहा किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रिस आढळून आले.
हा पदार्थ ‘वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’ नुसार अनुसूची १ (स्पर्म व्हेल) अंतर्गत प्रतिबंधित आहे. त्यामुळे कस्टम्स अधिकाऱ्यांनी हे अंबरग्रिस जप्त करून संबंधित दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांना खेड येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, जप्त केलेला मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तस्करीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कस्टम्स विभागाने केले आहे. तस्करीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि नियमानुसार योग्य ते बक्षीस दिले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती नागरिक ८४२११८८७५० या क्रमांकावर (व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे) देऊ शकतात.
या कारवाईचे नेतृत्व सुप्रीडेट (प्रतिबंधक आणि गुप्तचर) अतुल पोतदार यांनी केले. यामध्ये सीमाशुल्क अधिकारी – (अधीक्षक), श्रीमती कविता नायर (अधीक्षक), श्री. रविकांत (अधीक्षक), प्रतीक अहलावत (निरीक्षक), धीरज ओझा (निरीक्षक), नितेश शर्मा (निरीक्षक), सुहास विलणकर (मुख्य हवालदार), करण मेहता (हवालदार), गौरव मौर्य (हवालदार), प्रशांत खोब्रागडे (हवालदार), अमित पालशेतकर (सुखानी), किरण सागावकर (लाँच मेकॅनिक) आदी सहभागी झाले होते.



