नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात ५७ दात्यांचे रक्तदान
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानपत्र देऊन गौरव

लांजा : नगरपंचायतीचे नगरसेवक युवा उद्योजक पंढरीनाथ मायशेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ५७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष बाब म्हणजे प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. अनेक नवोदित रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठांच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक घटकांनी विशेष मेहनत घेतली. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात मानवतेचा संदेश पोहोचत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



