आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जूनला

रत्नागिरीतील १.५५ लाख शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २० जून रोजी केले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी थेट जमा केला जाईल.या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ४ वाजता https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर तसेच सर्व नागरी सेवा केंद्रांवर केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या थेट प्रक्षेपणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५५ हजार ६७० शेतकरी या २३ व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. या हप्त्यापोटी जिल्ह्यात एकूण ३१ कोटी ४४ लाख रुपयांहून अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत योजनेच्या गेल्या २२ हप्त्यांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ६६,७७७.८३ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे (Aadhaar Linking) आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

या किसान सन्मान संमेलनाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आणि नागरी सेवा केंद्रांमध्ये केले जाईल. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती आणि लाभ वितरणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!