एकही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
खेड नगरपालिकेचा कौतुकास्पद उपक्रम : दिव्यांग बांधवांना मदत

रत्नागिरी : “राज्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही,” अशी ग्वाही राज्याचे महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज, आन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
खेड नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के आरक्षित निधीतून थेट आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, माजी आमदार संजय कदम, जि प सदस्य अण्णा कदम, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिव्यांगांच्या अडचणींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, दिव्यांगांसाठी अनेक अत्यंत कल्याणकारी शासनाच्या योजना आहेत. मात्र, अनेक पात्र लाभार्थ्यांकडे यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगांना जागेवरच यूडीआयडी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.
खेड नगरपालिकेने यावर्षी दिव्यांग बांधवांना थेट आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगत गृहराज्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन केले. दिव्यांगांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही नगरपालिका सातत्याने पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
खेड नगरपालिकेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे स्थानिक दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. त्यातच आता आगामी काळात यूडीआयडी प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध शासकीय योजनांचे दरवाजे खुले होणार आहेत. नगरपालिकेने उचललेले हे गतिमान पाऊल आणि गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी दिलेली हमी यामुळे खेडमधील दिव्यांग बांधवांमध्ये कमालीचा आनंदाचे आणि नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.



