प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय रिफ्रेशर प्रशिक्षण यशस्वी

रत्नागिरी : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य विभाग, मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय रिफ्रेशर प्रशिक्षणाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंबळे (ता. मंडणगड) येथे २४ व २५ जून या कालावधीत करण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समिती मंडणगडचे उपसभापती दीपक मालुसरे, सदस्य अनिल रटाटे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत करून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, परिणामकारक व लोकाभिमुख बनविणे हा होता. प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी यांनी केले. प्रशिक्षणामध्ये सीपीएचसी नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नगमा बलबले , स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साळुखे तसेच मानसरोगतज्ज्ञ डॉ. अवघडे यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषयानुरूप मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.



