स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेत प्रतिकात्मक वटवृक्षाची सामूहिक पूजा

दापोली : वटपौर्णिमेनिमित्त साईनगर येथील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेतील गृहिणींनी एकत्र येऊन प्रतिकात्मक वटवृक्षाची सार्वजनिक पूजा करून परंपरेचे जतन केले. आधुनिक शहरी जीवनात मोठा वटवृक्ष सहज उपलब्ध होत नसल्याने संस्थेच्या आवारातील प्रतिकात्मक वटवृक्षाची पारंपरिक विधीनुसार पूजा करण्यात आली.
यावेळी महिलांनी वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळला, पूजा-अर्चा केली आणि पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य व ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमासाठी सुचिता सुजित पवार, प्रियांका हांडे, सिद्धी इदाते, सई इदाते, सोनी शर्मा, मैथिली भागवत आणि ऋतुजा औटी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेतील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वटपौर्णिमेचा सण सामूहिक स्वरूपात साजरा केला. या उपक्रमामुळे परंपरेचे जतन, सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेह अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक परंपरांचे जतन करत सामूहिक सहभागातून समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



