मूकबधिर विद्यार्थी होत आहेत आत्मनिर्भर : डॉ. अक्षय फाटक
कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा ४५ वर्धापनदिन उत्साहात

रत्नागिरी : मूकबधिर विद्यार्थी आत्मनिर्भर होत आहेत. या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी थक्क झालो आहे. संस्था व पालक त्यांना सक्रिय पाठबळ देत असल्याने हे शक्य झाले आहे. सामान्य माणूस काम न करण्यासाठी कारणे देतो, पण हे विद्यार्थी जे काही कामगिरी करत आहेत त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सायबर तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी काढले.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या ४५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, संस्था सदस्य सीए मंदार जोशी, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी राधिका मुरकर आदी उपस्थित होते.
सौ. बोपर्डीकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षक निवृत्त होऊनही शाळेच्या संपर्कात राहून मदत करत आहेत. माजी विद्यार्थ्यांचे व पालकांनाही शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेतर्फे वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, शिक्षिका मंगल कोळंबेकर, रमेश घवाळी व पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. इस्रो भेट, दहावीचे विद्यार्थी, शाळेत साजरे केले जाणारे सण, उत्सव, आनंदी दिवस, शिबिरे, हस्तकला प्रदर्शन यांची माहिती दिली.
शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये तीर्था नागवेकर, साक्षी पेढे, मोहफिज पेटकर, मुईज बंदरी हे चारही विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. देणगीदारांच्या मदतीतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश आदींचे वाटप करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना वह्या, रंगपेटी व अन्य साहित्य दिले. सूत्रसंचालन सीमा मुळ्ये यांनी केले. राजकुमार कसबे यांनी आभार मानले.
शाळेत शिकून, दहावीचे शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडले तरी शाळेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. सर्वच्या सर्व माजी विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांचे वैवाहिक पुनर्वसनही होते. या वर्षी तीन दांपत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



