Uncategorized

लोटे एमआयडीसीमधील कंपनीतील विषारी राख मोकळ्या जागेत टाकल्याचा प्रकार 

मोकाट प्राण्यांच्या जीविताला धोका : खेड येथील भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांचा आक्रमक पवित्रा

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील एका कंपनीतून ओपन प्लॉटमध्ये विषारी केमिकलयुक्त राख टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विषारी राख पावसाच्या पाण्यात मिसळून इतरत्र पसरत असल्यामुळे गायी-गुरांच्या जीविताला धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरणार आहे. या प्रकाराबाबत खेड तालुक्यातील भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे आक्रमक झाले आहेत.

लोटे एमआयडीसीमधील एका कंपनीमधील विषारी रासायनिक राख कंपनीच्या बाजूच्या मोकळ्या आवारात उघड्यावर टाकण्यात आली. पावसाळा चालू असल्याने ती विषारी राख पाण्यामध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या गुरांना या विषारी पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच विभागात जलजीवन मिशनचे पिण्याच्या पाण्याचे काम सुद्धा चालू आहे. हे विषारी पाणी पावसाच्या पाण्यासोबत वाहून पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळल्यास स्थानिक नागरिकांना सुद्धा जीवाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकाराबाबत भाजप उत्तर जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनासोबत या कंपनीचे काही साटेलोटे आहे का, अशा प्रकारची विषारी राख ओपन प्लॉटमध्ये टाकण्याची या कंपनीला रीतसर परवानगी आहे का, या प्रकारामुळे गायी गुरे, माणसे दगावली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!