रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची तत्परता
अंजणारी घाटातील भीषण ट्रेलर अपघातात चालकाचा जीव वाचविण्यात यश

रत्नागिरी/लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटातील (ता. लांजा) बस स्टॉपजवळ ट्रेलरचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रेलरचा रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळून भीषण अपघात झाला. ही घटना आज (३ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यात ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने तत्परता दाखवली.
मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलरचा (क्र. एमएच-४६-डीसी-२७६३) ब्रेक अचानक निकामी झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हा ट्रेलर रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळून भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनचालक राजकुमार रामकिशोर साहू (वय ३५, रा. लोही, जि. रिवा, रा. मध्य प्रदेश) हा वाहनाच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडला होता. तसेच ट्रेलरमधील कोटेड कॉईल मालाचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती डायल ११२ वर प्राप्त होताच तात्काळ लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती मैनदाड तसेच पोलीस अंमलदार यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व जीवाची पर्वा न करता पोलीस पथकाने जेसीबी, फायर ब्रिगेड आणि इतर बचाव यंत्रणांच्या मदतीने वाहनाची केबिन उघडून चालकाची सुखरूप सुटका केली. त्यानंतर जखमी चालकास तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी प्रभावी वाहतूक नियोजन करून अल्पावधीतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
या संपूर्ण बचाव व मदत कार्यामध्ये लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे पथक, १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा, फायर ब्रिगेड, जेसीबी सेवा, स्थानिक नागरिक तसेच स्थानिक प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले. या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादामुळे जखमी चालकाचा जीव वाचविण्यात यश आले असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि मानवतावादी भूमिका अधोरेखित झाली आहे.



