मुख्य बातमी

समाधान समारोह अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन

३१ जुलैपर्यंत प्रकरणांची नोंदणी करण्याची मुदत

रत्नागिरी : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने ‘समाधान समारोह २०२६’ अंतर्गत आगामी २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आपसी समन्वयातून आणि तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या समाधान समारोह उपक्रमांतर्गत प्रकरणे संदर्भित करण्याची अंतिम मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र प्रकरणे आपसी संमतीने सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद वाय. जाधव तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबाळकर यांनी केले आहे.

२१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा समारोप ऑगस्ट महिन्यातील विशेष लोकअदालतीद्वारे होणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी व तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘सहभागी न्याय’ आणि ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

पक्षकारांना तसेच संबंधित प्रकरणातील वकिलांना आभासी व्यासपीठाद्वारे (Virtual Platform) या विशेष लोकअदालतीमध्ये उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने सोडवावीत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी सांगितले.

विशेष लोकअदालतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

मोबाईल क्रमांक: ८५९१९०३६०८

दूरध्वनी क्रमांक: ०२३५२–२२४७६८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!