रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून तळोजा (नवी मुंबई) येथे विविध अंमली पदार्थ नाश

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलामार्फत २०१९ ते २०१६ या कालावधीत जिल्हाभरात विविध ठिकाणी कारवाया करून जप्त करण्यात आलेल्या ८९ लाख ७२ हजारांचा विविध अमली पदार्थांचा नाश तळोजा (नवी मुंबई) येथे आज (४ जुलै) येथे करण्यात आला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई यांनी एनडीपीएस ऍक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्यासाठी सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समिती (Drugs Disposal Committee) ची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे हे असून या समितीच्या सदस्य हे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) राधिका फडके या आहेत.
या समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बगाटे यांनी रत्नागिरी घटकामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याची कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना पुढील निर्देश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सन २०१९ ते सन २०२६ या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ११ एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले. व नमूद गुन्ह्यातील एनडीपीएस मुद्दे माल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता.
त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल हा एमडब्ल्यूएमएल तळोजा, नवी मुंबई येथे नाश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे आज ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे व पथकाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल ११ विविध गुन्ह्यातील गांजा (१० किलो ४९ ग्रॅम ५ मिलिग्रॅम), गांजा रोपे (४३), चरस (९ किलो ७८ ग्रॅम), कोकेन (युरिया, ९२६ ग्रॅम) असा एकूण २० किलो ५३ ग्रॅम ५ मिलिग्रॅम म्हणजेच ८९,७२,००५ किंमतीचा मुद्देमाल सुरक्षितपणे तळोजा, नवी मुंबई या ठिकाणी घेऊन जाऊन मुद्दे माल जाळण्याच्या पद्धतीने यशस्वीरित्या नाश केला आहे.



