मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चालत्या मांडवी एक्सप्रेसमधून आई-मुलाला ढकलले; तरुणीचा मृत्यू, बालक जखमी; एकावर खुनाचा गुन्हा

खेड : तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेत चालत्या मांडवी एक्सप्रेसमधून एका २५ वर्षीय विवाहितेला आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलाला खाली ढकलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून बालक जखमी झाले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास शुभ्रा अतिश दिवेकर (वय २५, रा. अंजनी, ता. खेड) या आपल्या दीड वर्षांच्या मुलगा अद्वैतसह मांडवी एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. अंजनी रेल्वे स्थानकाजवळ आरोपी सचिन सत्यवान जुळे (वय २९, रा. कोतवली, ता. खेड) याने दोघांना चालत्या रेल्वेतून खाली ढकलल्याचा आरोप आहे.

या घटनेत शुभ्रा दिवेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर त्यांचा मुलगा अद्वैत याच्या चेहऱ्यावर व पायावर किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर आरोपीनेही रेल्वेतून उडी मारल्याचे समोर आले असून त्यालाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी मृत महिलेचे वडील सुभाष देऊ तांबे (वय ५९, व्यवसाय, शेती, रा. अंजनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१), १०९, ३५१(२), ३५१(३) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!