मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दहिवलीत दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू

खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भूस्खलन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा भाग अचानक घरावर कोसळला, यामध्ये एका वृद्ध महिलेची सुटका करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढिगारा शेलार कुटुंबाच्या घरावर आल्याने घराचा काही भाग जमीनदोस्त झाला आणि घरातील तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीमुळे ७५ वर्षीय कल्पना शेलार यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी कळबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार यांचा शोध घेण्याचे काम मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होते. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या परिसरात मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागातील माती सैल झाल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

प्रशासनाने शेलारवाडीतील काही घरे धोकादायक असल्याचे जाहीर केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा असा रौद्र अवतार आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत असून, बेपत्ता दोघांचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!