मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे इशारे गांभीर्याने घ्या : महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन

खेडमधील शेलारवाडी दुर्घटनास्थळाला दिली भेट; स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

रत्नागिरी : कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून, प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे व इशाऱ्यांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाला आज त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

शेलारवाडी येथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यमंत्री श्री कदम यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच मदत कार्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

माध्यमांशी संवाद साधताना महसूल राज्यमंत्री श्री कदम म्हणाले:

“आपण सर्वजण सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणारे आहोत. दरवर्षी आपल्याला अशा प्रकारच्या अतिवृष्टीचा आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जी ठिकाणे ‘धोक्याची’ म्हणून घोषित केली आहेत, त्या ठिकाणच्या नागरिकांनी शासनाने दिलेला इशारा या दिवसांमध्ये अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे.”

पुढील अनपेक्षित दुर्घटना किंवा जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येत प्रशासनाला सहकार्य करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन आणि यंत्रणा पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची किंवा अडचणीची जाणीव झाल्यास त्यांनी त्वरित स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

“तुम्हाला ज्या पद्धतीची मदत हवी असेल, ती पुरवण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे. तुम्ही कधीही प्रशासनाला हाक मारा, आम्ही तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहोत,” अशी ग्वाही देत त्यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!