मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे

लांजा तालुका संतापला; महावितरण कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा, १५ दिवसांची अंतिम मुदत

लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणि महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचे जिवंत उदाहरण बनली आहे. या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली महावितरण उपविभाग, लांजा कार्यालयावर धडक देण्यात आली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जवळपास दोन तास चाललेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकारी चव्हाण साहेब यांनी येत्या १५ दिवसांत लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

वीज नाही म्हणजे पाणी नाही, मोबाईल चार्ज नाही. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास नाही. शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे जगणे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. आठ-आठ दिवस नागरिकांना अंधारात ठेवणारी व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते, हा प्रश्न आता प्रत्येक लांजावासीय विचारत आहे.

एकीकडे सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रात मूलभूत वीजपुरवठाही सुरळीत देता येत नाही. हा विकासाचा डंका आहे की प्रशासनाच्या अपयशाचा नगारा, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

यावेळी रवींद्र डोळस यांनी स्पष्ट इशारा दिला की, “पंधरा दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर महावितरण कार्यालयाला घेराव घालून कायमचे टाळे ठोकण्याचा लढा लांजावासी उभारतील.”

हा इशारा केवळ एका पक्षाचा नाही, तो अंधारात जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या संतापाचा आवाज आहे. प्रश्न एवढाच आहे महावितरणला नागरिक फक्त वीजबिल भरण्यासाठीच आठवतात का? सेवा देण्याची जबाबदारी कोणाची? आठ दिवस अंधारात ठेवून नंतर आश्वासनांची मेणबत्ती पेटवण्यात काही अर्थ उरत नाही. जनतेला भाषणे नकोत, अखंड वीजपुरवठा हवा आहे.

महावितरणने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरते की पुन्हा एकदा नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते, याकडे संपूर्ण लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनात लांजा तालुका प्रमुख हांदे, युवासेना तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, उपशहरप्रमुख प्रकाश (बाबू) गुरव, पुनस सरपंच संतोष लिंगायत, रिंगणे सरपंच संजय आयरे, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, उपसरपंच विग्नेश गुरव, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, उपसरपंच प्रमोद गुरव, बाबा धावणे, भाई कामत, प्रकाश पांचाळ, निकेश कडू, घनश्याम कडू, सिद्धेश गुरव, किशोर कांबळे, दिनेश गुरव, गोपीनाथ गुरव, राजा कामत, पाटोळे, अनिल कासारे, अमोल पांचाळ, महेश कांबळे, धर्मेंद्र पालीये, बबन दळवी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!