‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
कशेडी घाटातील दरडीनंतर भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनावर निशाणा

खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. कोकणात दरवर्षी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असतानाही प्रशासनाने प्रभावी नियोजन केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
ॲड. खेडेकर म्हणाले की, रात्री अडीच वाजल्यापासून शेकडो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. त्यांना लवकर मार्ग मोकळा करून देता यावा यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी महामार्गाच्या ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने मदतकार्य संथ गतीने सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेतल्या जातात, मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी पुरेशा प्रमाणात पोकलेन, डंपर आणि अन्य यंत्रसामग्री तैनात असती तर दोन ते तीन तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असता, असा दावा त्यांनी केला. मात्र सध्या यंत्रसामग्रीची कमतरता असून पुढील काही तासांतही रस्ता पूर्णपणे मोकळा होईल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचीही कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ॲड.वैभव खेडेकर यांनी सांगितले.



