मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला

वन विभाग आणि कॉर्पोरेट सीएसआरच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामस्थांना दिलासा; १० लाखांचा निधी मंजूर

चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि नागपूरच्या खाजगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) संयुक्त प्रयत्नातून गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या (तळी) पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण तिवडी गावात सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना, विशेषतः वृद्ध आणि महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी सह्याद्रीचा कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या चार गावांमध्ये भटकंती करावी लागत असे. कडक उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होऊन गावाला प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

तिवडी गावामध्ये ‘तळी’ म्हणून ओळखले जाणारे झऱ्याचे पाणी असलेले एक मोठे पारंपारिक कुंड आहे. या कुंडातील नैसर्गिक झऱ्याला बाराही महिने पाणी असते. पूर्वी या झऱ्याच्या पाण्यामुळे शेजारील दोन विहिरींची पाण्याची पातळी उन्हाळ्यातही टिकून राहत असे. मात्र, २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये या कुंडाचे बांधकाम पूर्णपणे ढासळले आणि तेव्हापासून गावकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला.

हे गाव वनविभागाच्या क्षेत्रात येत असले, तरी हे कुंड असलेल्या जागेची मालकी खासगी असल्याने त्या कामासाठी शासकीय निधी मंजूर करण्यात कायदेशीर व तांत्रिक अडचणी येत होत्या. वनविभागाच्या समितीमार्फत यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु यश येत नव्हते. अखेर, गावाचे माजी सरपंच प्रकाश पवार यांनी रत्नागिरी (चिपळूण) येथील विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई (पाटील) आणि चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांच्याकडे या कामासाठी विशेष मदत मागितली.

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून शासकीय निधीच्या मर्यादांवर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी नागपूर येथील ‘लॉईड्स मेटल एनर्जी अँड ऋषभ मेटा इस्पात प्रा. लि.’ या कंपनीकडे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत या कुंडाच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठवला. लोकांची निकड पाहून कंपनीच्या प्रतिनिधी सौ. इंद्रायणी मॅडम यांनी तात्काळ दखल घेत कंपनीमार्फत तब्बल १० लाख रुपयांचा धनादेश (चेक) मंजूर केला. यामुळे गेल्या दोन दशकांचा हा जळजळीत प्रश्न एका झटक्यात मार्गी लागला.

या निधीच्या हस्तांतरासाठी आणि कामाच्या शुभारंभानिमित्त तिवडी गावात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विभागीय वन अधिकारी मा. गिरीजा देसाई (पाटील), ‘लॉईड्स मेटल एनर्जी’च्या प्रतिनिधी सौ. इंद्रायणी मॅडम, वन परिक्षेत्र अधिकारी मा. सरवर खान, वनपाल श्री. एस. एस. सावंत, कोळकेवाडीचे वनरक्षक श्री. कृष्णा इरमले, रामपूरचे वनरक्षक श्री. राहुल गुंठे, कंपनीचे प्रतिनिधी श्री. सुमित महाजन, तिवडी गावच्या विद्यमान महिला सरपंच, माजी सरपंच श्री. प्रकाश पवार, ग्रामविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने तिवडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

शासकीय यंत्रणा आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र येऊन दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे तिवडी गावाची पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबणार असून, ग्रामस्थांनी वन विभाग आणि संबंधित कंपन्यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!