पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना बंदी

रत्नागिरी : पावसाळ्यामध्ये वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असून उधाणामुळे उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन गणपतीपुळेसह आरे वारे, भाट्ये येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना रोखण्याच्या सूचना रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पालकमंत्री यांच्या या सूचनेचे पालन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले असून ९ जुलैपासून गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मोठी दोरी बांधून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासक कल्पना पकये यांनी सांगितले की, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेचे आम्ही पालन केले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा हा धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी उतरू नये यासाठी संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर मोठी दोरी बांधली आहे. समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबत आणि बांधलेल्या दोरी बाबत पर्यटकांना सूचना देण्यासाठी आमचे जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यावर कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांकडून पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबत माहिती देण्यात येऊन समुद्रकिनाऱ्याचा आनंद दुरूनच घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत.
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत; परंतु समुद्राला येणाऱ्या उधाणमुळे लाटांचा तीव्र मारा किनाऱ्यावर होत असतो. तसेच समुद्रातील बदलणारे करंट यामुळे पाण्याला ओढ अधिक असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रातील पाण्यात उतरू नये अशी स्पष्ट ताकीद प्रशासनाने दिली आहे. याबाबत समुद्र किनाऱ्यांशी निगडित असलेल्या ग्रामपंचायतींना लवकरच प्रशासनाकडून लेखी आदेश प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



