वाशिष्ठी नदीत उडी घेत तरुणाची आत्महत्या; कालूस्ते परिसरात आढळला मृतदेह

चिपळूण : बाजारपुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन एका २५ वर्षीय तरुणाने शनिवारी (११ जुलै) रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. रिजवान बरकार (वय २५, रा. गोवळकोट, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जुलै रात्री १० वाजण्याच्या सुमारास रिजवानने बाजारपुलावरून नदीत उडी घेतली. काही प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना पुलावर रिजवानची चप्पल आणि घड्याळ सापडले, ज्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय बळावला.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम राबवली. मात्र, अंधार आणि नदीच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कालूस्ते परिसरात रिजवानचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तरुणाने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह सापडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.


