मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये इयत्ता सहावीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार जिल्हास्तरीय प्रशिक्षण
रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी) २०२० अन्वये इयत्ता सहावीच्या पुनर्रचित मराठी माध्यम अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), रत्नागिरी यांच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाद्वारे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘डाएट’चे प्राचार्य सुशील शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, अधिव्याख्याता लवू आचरेकर आणि श्री. लठ्ठे, तज्ञ मार्गदर्शक सुहास शेल्ये, मोहन बापट, सुहास वाडेकर, संजना वारंग, नमिता वैद्य, प्रज्ञा खोब्रागडे आणि समन्वयक श्वेता कवितके आणि देवयानी पवार उपस्थित होत्या.
उद्घाटनपर भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन या अभ्यासक्रमाविषयी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे कौशल्य आधारित अभ्यासक्रम विषयी प्रशिक्षणार्थींना माहिती दिली. या प्रशिक्षणात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ९६ मराठी माध्यम शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणासाठी परिषद दालन, वर्गखोल्या, निवास व्यवस्था तसेच अन्य आवश्यक सुविधा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात उपलब्ध करून देण्यात आल्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



