आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त खेड बस स्थानक व भरणे नाका येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

रत्नागिरी/खेड : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जुलै २०२६ हा “डेंग्यू प्रतिरोध महिना” म्हणून विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने खेड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने खेड बस स्थानक व भरणे नाका येथे डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

या अभियानात एमईएस परशुराम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी पथनाट्य सादर करून डेंग्यूची लक्षणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, साठवलेल्या पाण्याची नियमित तपासणी करणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच ताप आल्यास तात्काळ शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घेण्याबाबत नागरिकांना प्रभावी संदेश दिला.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी डेंग्यू प्रतिरोध महिन्याचे घोषवाक्य “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” असे असून, डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभागाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती खेडच्या सभापती डॉ. आफिया नजीब पालेकर, गटविकास अधिकारी विजय करपे, पंचायत समिती सदस्य संग्राम सतीश कदम, प्रशांत पांडुरंग चव्हाण, निसार जाफर सुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, आरोग्य विस्तार अधिकारी रमेश महाडिक, श्रीमती गोरे, आरोग्य सेवक अजित तटकरी, आरोग्य सहाय्यक श्री. घाडगे, विकास जाधव, अभय देसाई, आरोग्य सेवक श्री. गुरव, श्री. केदार, क्षेत्रीय कर्मचारी सचिन जाधव, आशा सेविका तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती डॉ. आफिया नजीब पालेकर, गटविकास अधिकारी विजय करपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी नागरिकांना आवाहन केले की, “डेंग्यू प्रतिबंधासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या व परिसरातील पाणीसाठ्यांची नियमित तपासणी करून स्वच्छता राखावी, पाण्याची भांडी झाकून ठेवावीत, डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. लोकसहभागातूनच डेंग्यूमुक्त समाज निर्माण करणे शक्य आहे.”

या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!