मुख्य बातमी

अयोध्या श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाचे रत्नागिरीत तीव्र पडसाद

तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाची महाआरती

रत्नागिरी : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या धक्कादायक प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी १५ जुलै रोजी रत्नागिरी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ठीक ६ वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक राम आळी परिसरातील श्री राम मंदिरात महाआरतीचे आयोजन करून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

या महाआरतीचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील व शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मुख्य महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री. शेरे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अयोध्या येथील मंदिरात झालेली चोरी ही केवळ सुरक्षेतील त्रुटी नसून कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेवर झालेला मोठा आघात आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने राम मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आंदोलनादरम्यान ‘जय श्रीराम’ आणि प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी राम आळी परिसर दणाणून गेला होता. उपस्थित सर्व शिवसैनिकांनी आणि रामभक्तांनी चोरीच्या या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. या महाआरतीला शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या आंदोलनामुळे रत्नागिरीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणावर आता सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!