रत्नागिरीत सोमवारी डॉक्टर एक दिवसांच्या लाक्षणिक संपावर
डोंबिवली येथे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अमानुष हल्ल्याचा निषेध

रत्नागिरी : डोंबिवली- शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात येत्या उद्या (२० जुलै) सर्व डॉक्टर एक दिवसाच्या संपावर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेतर्फे १२० डॉक्टरांच्या ओपीडी सेवा बंद राहतील, अशी माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी ६ वाजेपर्यंत २४ तास दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. डॉक्टर सुरक्षित असतील तरच रुग्ण सुरक्षित राहतील. डॉक्टरांवरील हल्ले म्हणजे समाजाच्या आरोग्यावरील हल्ला आहे. विरूद्ध वापरलेली असभ्य, अभद्र आणि अश्लाघ्य भाषा व त्यांना झालेली मारहाण बघून महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यावसायिक विमनस्क आणि चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे हा कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
शंभर टक्के प्रशासकीय अपयशाचं खापर वैद्यकीय तज्ञांवर फोडणे, त्यांचे आई-बाप काढणे आणि सोबत गुन्हे दाखल असलेले गुंड आणून हल्ला करणे हे समस्त डॉक्टरांचे नुकसान करणारे आहे. समाजमाध्यमांवर आलेले व्हिडिओ व या बातम्या बघून कोण आपल्या मुलामुलींना डॉक्टर बनवेल का, अशा वृत्तींमुळे मेडिकल कॉलेजमध्ये जागा रिक्त राहत आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. अशा समाजकंटकांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. तात्काळ सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा २४ तास बंद राहणार आहेत.
रत्नागिरीतील जवळपास १२० डॉक्टर्स यामध्ये सहभागी होणार आहेत. हल्लेखोरांवर तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, महाराष्ट्र मेडिकेअर कायदा अधिक कडक व प्रभावी करावा, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण लागू करावे, डॉक्टरांना सुरक्षित सन्मानपूर्वक व निर्भय वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. सोमवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही सादर करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे.



