महाराष्ट्रमुख्य बातमी

मत्स्य विभागात होणार २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती

मत्स्य विभागाचे कामकाज होणार वेगवान : किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागासाठी नवीन आकृतीबंध लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे मत्स्य विभागात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क पदांची भरती करण्यात येणार आहे.

मत्स्य विभागाच्या इतिहासात प्रथमच नवीन आकृतीबंधाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजना, मत्स्य संवर्धन, किनारपट्टी भागातील विकासकामे आणि मत्स्यव्यवसायिकांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या भरतीमुळे राज्यातील २५४ मत्स्यविज्ञान पदवीधरांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होणार असून, बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. ना. नितेश राणे यांच्या या महत्वाच्या पुढाकारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या भावी पिढ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे.

तसेच नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर मत्स्य विभागाचे कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि लोकाभिमुख होणार असून, मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायिकांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!