दापोली-खेड शिरशिंगे फाटा येथे दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू; मैत्रीण जखमी

दापोली : दापोली- खेड मार्गावरील शिरशिंगे फाटा परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणीचा मृत्यू झाला असून दुसरी तरुणी जखमी झाली आहे. हा अपघात आज (२८ जुलै) सकाळी ८.३० च्या सुमारास घडला.
याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेजल पांडुरंग भागवत (वय २२) ही तिची मैत्रिण वैष्णवी चंद्रकांत आयरे हिच्यासोबत दुचाकी (क्र. एमएच-०८-बीजे-९९६३) घेऊन टेटवली येथे जात असताना सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा शिरशिंगे फाटा परिसरात रस्त्यावर घसरून अपघात झाला. या अपघातात दोघीही रस्त्यालगतच्या पाण्याच्या मोरीत पडल्या. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सेजल पांडुरंग भागवत हिला सकाळी ९.५० वाजता मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हेड कॉनस्टेबल रुपाली ढोले करत आहेत.


