राजापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र अवैध; जिल्हा जात पडताळणी समितीचा निर्णय
अफरोज झारी यांचे नगरसेवक पद धोक्यात : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

राजापूर : नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका अफरोज महंमद झारी यांचे इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. या निर्णयामुळे राजापूर पालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या नगरसेवक पदाबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडून काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक ६ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव होता. या निवडणुकीत अफरोज झारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित उमेदवार निलोफर मुकादम यांचा पराभव केला होता. त्यानंतर निलोफर मुकादम यांनी झारी यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर त्रिसदस्यीय समितीने झारी यांचे ‘इतर मागास वर्ग’ जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. समितीने उपविभागीय अधिकारी, राजापूर यांनी दिलेले जातप्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
समितीच्या आदेशानुसार झारी यांचे निवडणुकीसाठी सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले असून, या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने जिल्हा जात पडताळणी समितीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून, त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
जर जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या निर्णयानुसार नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली, तर राजापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या संख्याबळावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


