मुख्य बातमी

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), दिवा आणि पुणे येथून सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावसाठी या विशेष गाड्या धावतील.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड (०११०३/०११०४), मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड (०११५१/०११५२), लोकमान्य टिळक – सावंतवाडी रोड (०११७१/०११७२) आणि मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी (०११५३/०११५४) या गाड्या ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज चालवल्या जाणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी (०११६७/०११६८) ही गाडी आठवड्यातून पाच दिवस धावेल. याशिवाय दिवा – खेड (०११५५/०११५६) आणि दिवा – चिपळूण (०११३३/०११३४) या मार्गांवर दैनंदिन मेमू (MEMU) स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

नोकरदार आणि साप्ताहिक प्रवास करणाऱ्यांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड आणि मडगाव दरम्यान साप्ताहिक व द्विसाप्ताहिक विशेष गाड्या (०११२९/०११३०, ०११३१/०११३२, ०११६५/०११६६ आणि ०११८५/०११८६) सोडण्यात येणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे – रत्नागिरी विशेष गाडी (०१४४५/०१४४६ आणि ०१४४७/०१४४८) आठवड्यातून ठराविक दिवशी धावणार आहे. या सर्व गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ या प्रमुख स्थानकांवर थांबतील.

या विशेष गाड्यांचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, १ ऑगस्ट २०२६ रोजी ट्रेन क्र. ०११५४, ०११६८, ०१४४६ व ०१४४८ चे बुकिंग सुरू होईल. २ ऑगस्ट २०२६ रोजी ट्रेन क्र. ०११६६ व ०११८६, तर ३ ऑगस्ट २०२६ रोजी ट्रेन क्र. ०११०४, ०११३०, ०११५२, ०११७२ व ०११३२ या गाड्यांचे आरक्षण सर्व पीआरएस (PRS) केंद्र, आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळ व ॲपवर सुरू होईल. प्रवाशांनी वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!