मुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी

भारतमाता समर्पण संस्कार आणि वृक्ष पूजन उत्साहात संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि संस्कारमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवी आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती काणे आणि श्रीमती जंगम (विषय तज्ज्ञ, पंचायत समिती, रत्नागिरी) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांनी गीतगायन, भरतनाट्यम् नृत्य आणि भाषणांमधून गुरुंना वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, ‘डाएट’चे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी सदिच्छा भेट दिली. किरण लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य शिवलकर यांनी आपल्या मनोगतामध्ये जीवनातील आदर्श व्यक्तींविषयी विद्यार्थ्यांना बोलते करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते किरण सनगरे यांनी गुरु शिष्यांच्या विविध गोष्टी ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना सांगितल्या आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले.

विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारत मातेविषयी समर्पणाची भावना जागृत करण्यासाठी भारतमाता समर्पण सोहळा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या प्रतिमेसमोर समर्पण कलशामध्ये स्वेच्छेने गुरुदक्षिणा समर्पण केले. निसर्ग आपला गुरू आहे, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. म्हणून शालेय परिसरातील वृक्षाचे पूजन करून वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये आई-वडील, शिक्षक, निसर्ग, पुस्तके आणि भारतमाता हे आपले गुरु आहेत, त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना पुष्प देऊन वंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून खाऊ देण्यात आला.

गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख वेदरे, मेस्त्री तसेच ऐवळे, गार्डी यांसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!