टोकियोतील ‘आयबीएस २०२६’मध्ये प्रमोद शिंदे यांचे मोलाचे योगदान

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील पेढांबे गावचे सुपुत्र आणि मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (MRAI) चे कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे यांनी टोकियो, जपान येथे होणाऱ्या ४थ्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय शिखर परिषद (आयबीएस २०२६) आणि एमआरएआय रोडशोच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या अनुषंगाने भारतीय दूतावास, जपान येथील आर्थिक व वाणिज्य मंत्री श्रीमती देबजानी चक्रवर्ती यांच्यासोबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस एमआरएआयचे सचिव जनरल अमर सिंह, संचालक बी. के. सोनी आणि कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान भारतातील पुनर्वापर उद्योग, परिपत्रक अर्थव्यवस्था (Circular Economy), शाश्वत विकास आणि संसाधन सुरक्षितता यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. एमआरएआयतर्फे धातू, प्लास्टिक, कागद, ई-कचरा, बॅटरी, टायर, वस्त्रोद्योगातील कचरा, वापरलेले तेल, कालबाह्य वाहने तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
श्री. शिंदे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विविध देशांतील जागतिक दर्जाचे वक्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. भारताच्या उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या सुरक्षिततेसाठी (Raw Material Security) तसेच पुनर्वापर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी जागतिक स्तरावर संवाद निर्माण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
श्रीमती चक्रवर्ती यांनी एमआरएआयच्या कार्याचे कौतुक करत रोडशोसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली. तसेच भारत-जपान यांच्यातील पुनर्वापर, संसाधन पुनर्प्राप्ती, प्रगत तंत्रज्ञान, हरित गुंतवणूक आणि परिपत्रक अर्थव्यवस्था क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
टोकियो येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणारी आयबीएस २०२६ परिषद भारत आणि जपानमधील उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी चिपळूणच्या पेढांबे गावातील सुपुत्र प्रमोद शिंदे यांनी बजावलेली भूमिका संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद ठरत आहे.



