ठाकरे युवासेनेकडून “स्विगी गर्ल्स”चा गौरव
सकाळी ११ ते रात्री ११ मेहनत करणाऱ्या युवतींचे केले कौतुक

रत्नागिरी : मोटरसायकल वरुन रिस्क घेवून आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेकडून “स्विगी गर्ल्स”चा गौरव करण्यात आला.
सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत स्विगी डिलिव्हरीचे काम करून कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या या युवतींच्या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक केले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात शिवसेना रत्नागिरी तालुका समन्वयक शेखर घोसाळे आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. पुढील काही दिवसात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले.
कोणतेही काम लहान-मोठे नसते आणि महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हा संदेश देण्यासाठी युवासेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना काळापासून डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्या महिला आजही आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या मेहनतीला सलाम म्हणूनच हा गौरव करण्यात आल्याचे युवासेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास ठाकरे शिवसेना आपल्या सोबत असेल असे आश्वासनही त्यांना देण्यात आले.
यावर स्विगी गर्ल्स म्हणाल्या की, “आमच्या कार्याची दखल घेवून तुम्ही जो आमचा सन्मान केलात त्याबद्दल जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचे आभार आम्ही मानतो”



