दिल्ली आर्मी बेस कॅम्पमध्ये ‘सिंदूर महारक्तदान’ला सुरुवात
क्रांती दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम

नवी दिल्ली : क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील आर्मी बेस कॅम्पमध्ये ‘सिंदूर महारक्तदान’ अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये दाखल झालेल्या पैलवानांसह सहभागी नागरिकांकडून महारक्तदानाला प्रारंभ झाला असून, रक्तदानाच्या माध्यमातून देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जात आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र क्रीडासेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून या महारक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत. क्रांती दिनाच्या निमित्ताने देशाच्या संरक्षणासाठी समर्पित जवानांच्या भूमीत महाराष्ट्राच्या पैलवानांकडून होणारे हे महारक्तदान विशेष महत्त्वाचे ठरत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सकाळी आर्मी बेस कॅम्प येथे भेट देऊन महारक्तदान अभियानाच्या संपूर्ण नियोजनाचा, व्यवस्थेचा आणि मुख्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. सहभागी पैलवान, रक्तदाते आणि आयोजनाशी संबंधित विविध व्यवस्थांबाबत त्यांनी संबंधित पदाधिकारी व आयोजकांकडून माहिती घेतली.
गेल्या वर्षी जम्मूमध्ये महारक्तदानाचा विक्रम घडविणाऱ्या महाराष्ट्राच्या पैलवानांनी सलग दुसऱ्या वर्षी नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे. आखाड्यात आपल्या सामर्थ्याची ओळख निर्माण करणारे हे पैलवान आज रक्तदानातून मानवतेची सेवा करत महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीची ताकद दाखवत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी, रक्तदानातून सेवाभावाची नवी चळवळ उभी करण्याचा हा संकल्प आहे.



